विमुक्त, भटक्या व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा

by Team Satara Today | published on : 03 June 2026


सातारा : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच त्याअंतर्गत कार्यरत विविध उपकंपन्यांमार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज योजनांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यव्सथापक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांनी केले आहे.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या अखत्यारीतील पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, ब्रम्हलीन आचार्य दिव्यानंद महाराज आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण नाईक आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ तसेच श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून विविध समाजघटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी योजना राबविण्यात येत आहेत.

महामंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजना, एक लाख रुपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज योजना तसेच गट कर्ज योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून स्वयंरोजगार, व्यवसायवृद्धी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजना उपयुक्त ठरणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत. योजनांबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी बिल्डिंग, सर्व्हे क्र. २२-अ, जुनी एमआयडीसी रोड, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुलाजवळ, सातारा येथे संपर्क साधावा.

जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या या आर्थिक विकास योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगार व आर्थिक प्रगतीची संधी साधावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किरण म. गिन्हे यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवकांच्या हाताला काम मिळणे ही आजची सर्वात मोठी गरज - खा. उदयनराजे, देगाव येथील रोजगार महामेळाव्यात दोन हजारांपेक्षा जास्त उमेदवारांची निवड
पुढील बातमी
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत अभयसिंह जगताप महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार

संबंधित बातम्या