युवकांच्या हाताला काम मिळणे ही आजची सर्वात मोठी गरज - खा. उदयनराजे, देगाव येथील रोजगार महामेळाव्यात दोन हजारांपेक्षा जास्त उमेदवारांची निवड

by Team Satara Today | published on : 03 June 2026


सातारा : शिक्षण पूर्ण केल्यानंतर युवकांच्या हाताला काम मिळणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर केवळ एका व्यक्तीचे नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे जीवनमान उंचावते. त्यामुळे युवकांना नोकरी आणि करिअरच्या संधी उपलब्ध करून देणारे उपक्रम अधिकाधिक राबविले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

देगाव येथे युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार महामेळाव्याला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार महेश शिंदे, भाजपा सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, युथ फाउंडेशनचे अध्यक्ष महेश सोनवणे, संग्राम बर्गे, कामेश कांबळे, हृदयनाथ पार्टे, फिरोज शेख, अमोल तांगडे, विनीत पाटील, राजेंद्र बर्गे-पाटील, रणजित माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उदयनराजे भोसले यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांना योग्य मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. रोजगार महामेळाव्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या आणि नोकरीच्या शोधात असलेले युवक एकाच व्यासपीठावर आले असून यामुळे रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळत आहे. अशा उपक्रमांमुळे युवक आत्मनिर्भर बनण्यास मदत होते आणि त्यांच्या भविष्यास नवी दिशा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

या रोजगार महामेळाव्याला सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी आदी भागांतील चार हजारांहून अधिक सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी उपस्थिती लावली. विविध उद्योग, सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. विशेष म्हणजे दोन हजारांहून अधिक उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध झाली.

आमदार महेश शिंदे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, शिक्षित बेरोजगार युवकांसाठी हा महामेळावा आशादायी ठरला असून पश्‍चिम महाराष्ट्रातील रोजगार क्षेत्रासाठी तो महत्त्वाचा टप्पा आहे. रोजगाराच्या संधी युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून भविष्यातही अशा प्रयत्नांना पाठबळ दिले जाईल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आंबेनळी अपघातग्रस्त कुटुंबीयांना तातडीने आर्थिक सहाय्य द्यावे; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
पुढील बातमी
विमुक्त, भटक्या व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा

संबंधित बातम्या