सातारा : वराडे (ता. कराड) येथील अरविंद बबन हजारे यांनी शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली असून प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सादर करण्यात आले.
अरविंद हजारे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असून अनेक वर्षांपासून घरकुलासाठी प्रयत्न करत आहेत. शासनाच्या विविध घरकुल योजनांमध्ये अर्ज करूनही अद्याप त्यांना लाभ मिळालेला नाही. याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाकडून शासकीय जागेवरील वास्तव्याचा मुद्दा उपस्थित करून घरकुलासाठी अपात्र ठरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही हजारे यांनी म्हटले आहे. मात्र, आपल्या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून पात्रतेनुसार लाभ द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
घरकुलाचा लाभ न मिळाल्याने कुटुंबीयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत, प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, हजारे यांच्या निवेदनावर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि या प्रकरणात पुढे काय निर्णय होतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.