सातारा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सातारा जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांची शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी केले आहे.
जिल्ह्यात मुलांची ७ आणि मुलींची ९ अशी एकूण १६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. निवास आणि भोजन व्यवस्था, शैक्षणिक साहित्य व निर्वाह भत्ताग्रंथालय, जिम आणि इतर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध असून प्रवेशाकरिता वेळेत अर्ज भरावेत.
प्रवेशासाठी प्रवर्ग: अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), इतर मागास प्रवर्ग (OBC) व विशेष मागास प्रवर्ग (SBC).
इयत्ता/अभ्यासक्रम: इयत्ता ८ वी ते १० वी, कनिष्ठ महाविद्यालय (११ वी व १२ वी), तसेच बी.ए., बी.कॉम, बी.एससी., पदव्युत्तर पदवी, आणि पदविका (डिप्लोमा) इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थी पात्र आहेत.
व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही अर्ज करता येईल.
सर्व वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून विद्यार्थ्यांना https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. शालेय विद्यार्थ्यांनी 30 जून पर्यंत अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी 15 जुलै पर्यंत अर्ज करावेत.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या विद्यार्थ्यांना जागेअभावी वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ ऑनलाईन पद्धतीने दिला जाईल. वसतिगृहात निवड न झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वाधार योजनेसाठी स्वयंचलितपणे (ऑटोमॅटिक) वर्ग केले जातील. त्यामुळे वसतिगृह प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज भरणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांनी वसतिगृहाचा अर्ज भरला नाही, त्यांना स्वाधार योजनेचा स्वतंत्र अर्ज करता येणार नाही.
विहित मुदतीपूर्वी पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंकवर जाऊन आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.