जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 'आपले सरकार सेवा केंद्र' येत्या तीन महिन्यांत सुरू करा; सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग यांचे निर्देश

by Team Satara Today | published on : 03 June 2026


सातारा : सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये 'आपले सरकार सेवा केंद्रांची' संख्या वाढवण्याची मोठी गरज असून, जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये येत्या तीन महिन्यांत ही सेवा केंद्र सुरू करावीत, असे स्पष्ट निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिले. तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 'आदर्श सेतू' व 'आदर्श सेवा केंद्र' उभारावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सेवा हक्क आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व विभागांमधील सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आयुक्त श्री. तेलंग बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महसूल उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी हे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

सर्व नागरिकांना विहित वेळेत पारदर्शक सेवा देणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून आयुक्त श्री. तेलंग म्हणाले की, "कायद्यानुसार नागरिकांना विहित वेळेत सेवा देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी गतिमान पद्धतीने काम करून जिल्ह्याचा सेवा वितरणाचा टक्का आणि क्रमांक उंचावण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी."

ते म्हणाले , सेतू आणि सेवा केंद्रांमधील व्यवस्था ही एखाद्या 'कॉर्पोरेट' कार्यालयाच्या धर्तीवर अद्ययावत असावी. नगरपालिका स्तरावर सर्व सेवा एकाच छताखाली देण्यासाठी 'आपले सरकार सेवा केंद्र' उभारण्यात यावे, तसेच नागरी क्षेत्रात लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्रांची संख्या वाढवावी. प्रत्येक शासकीय कार्यालयात दिल्या जाणाऱ्या सेवा आणि 'सेवा हक्क कायदा' याची सविस्तर माहिती देणारे डिजिटल माहिती फलक लावण्यात यावेत. सेतू केंद्र चालकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून, नागरिकांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त दर्जेदार सेवा कशी देता येईल, याचे मार्गदर्शन करावे, असेही आयुक्तांनी निर्देशित केले.

अपील प्रकरणांचा जलद निपटारा करा

"महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यानुसार विहित वेळेत सेवा न मिळाल्यास नागरिकांना प्रथम आणि द्वितीय अपील करण्याची तरतूद आहे. सेवा देणाऱ्या संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी या अपीलांवर तातडीने सुनावणी घेऊन प्रकरणांचा जलद निपटारा करावा. अपील ही या कायद्यातील अत्यंत महत्त्वाची तरतूद असून सर्व यंत्रणांनी तिचा योग्य व प्रभावी वापर करावा," अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि सातारा जिल्ह्यात लवकरच नागरिकांच्या सोयीसाठी 'आदर्श सेतू केंद्र' उभारण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वारस नोंदीसाठी लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी रंगेहाथ अटकेत; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पुढील बातमी
दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; दिव्यांग मुला-मुलींना प्रवेश देण्यात येणार

संबंधित बातम्या