सातारा जिल्हा परिषदेत चक्क तडीपार गुंडाच्या उपस्थितीत कापला केक

‘समाज कल्याण’चे सभापती ऋषिकेश धायगुडे यांच्या शासकीय केबिनमध्ये घडला प्रकार

by Team Satara Today | published on : 02 June 2026


सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेच्या वेळचा हायव्होल्टेज राडा अजूनही लोकांच्या स्मरणात असतानाच, आता जिल्हा परिषदेच्या लौकिकाला एक डाग लागला आहे. मिनी मंत्रालयात चक्क एका तडीपार गुंडाच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

समाज कल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे यांच्या शासकीय केबिनमध्ये हा सगळा प्रकार घडला असून, याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सातार्‍याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समाज कल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे-पाटील यांच्या शासकीय केबिनमध्ये त्यांचे मित्र शंभू साळुंखे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र, या सेलिब्रेशनला सातार्‍याच्या पोलीस रेकॉर्डवरील कुख्यात तडीपार गुंड बिर्‍या ऊर्फ अमित रमेश कदम हा उजळ माथ्याने उपस्थित होता. तडीपार असतानाही पोलिसांना चकवा देत तो थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात पोहोचला आणि त्याच्याच उपस्थितीत केक कापण्यात आला. यानंतर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वार्‍यासारखे पसरले. 

या प्रकरणावर तीव्र पडसाद उमटल्यानंतर समाज कल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे यांनी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले, माझे मित्र शंभू साळुंखे हे माझ्या कार्यालयात आले होते. आम्ही त्यांच्या वाढदिवसाचा केक कापला. पण त्यांच्यासोबत कोण आले होते, याची मला कोणतीही कल्पना नव्हती. हा सर्व प्रकार पूर्णपणे अनावधानाने घडला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्याचा न्यायदान पॅटर्न इतर जिल्ह्यांसाठी अनुकरणीय : न्यायमूर्ती राजेश पाटील
पुढील बातमी
नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरीत

संबंधित बातम्या