औंध : येथील सात हजार लोकसंख्येला पिण्याचे पाणीपुरवठा करणारा येळीव तलाव कोरडा पडत असून, आगामी काळात औंधसह परिसरातील गावांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी तलावातील उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत येळीव तलावाने औंध व परिसरातील गावांची पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भागविली. उरमोडी धरणातून दरफोडी कालव्याद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक पातळीवर पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, तलावात होणारी पाण्याची आवक अत्यल्प असताना दुसरीकडे शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पाणी उपशामुळे तलावातील साठ्यावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
तलाव परिसरातून शेकडो विद्युत मोटारींच्या साहाय्याने पाणी उपसा होत असल्याचे चित्र असून, या प्रकारावर नियंत्रण आणण्यात संबंधित प्रशासनाला अपयश आल्याची टीका होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असताना महसूल विभाग, पाटबंधारे विभाग तसेच महावितरण यांच्याकडून कोणतीही ठोस आणि प्रभावी कारवाई झालेली दिसून येत नाही. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा साठा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे.
सध्या उरमोडी धरणातून पाणी उपलब्ध होण्याची प्रक्रिया सुरू असली तरी तलावातील पाणी उपसा तातडीने थांबवून उपलब्ध पाणी साठविण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत तलाव परिसरातील अनधिकृत किंवा अतिरिक्त पाणी उपशावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्यास औंधसह परिसरातील गावांना टँकरवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय उरणार नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर येणाऱ्या काळात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
येळीव तलावातील पाणीसाठा कमी होत असताना मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला पाणी उपसा तातडीने थांबविण्याची गरज आहे, अन्यथा येत्या काही दिवसांत औंधसह परिसरातील गावांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते.