सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर दि. 5 व 6 जून रोजी भव्य शिवराज्याभिषेक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्यास युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांची उपस्थिती लाभणार आहे.
हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण मानल्या जाणार्या दि. 6 जून 1674 या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी रायगडावर राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. यंदाही ऐतिहासिक परंपरा जपत विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 5 जून रोजी राजमाता जिजाऊ साहेबांच्या समाधीस अभिवादन करून कार्यक्रमांची सुरुवात होईल. त्यानंतर शिवभक्तांच्या सहभागातून नाणे दरवाजामार्गे गड चढाई करण्यात येणार आहे. गडपूजनानंतर पारंपरिक युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली जातील. सायंकाळी ढोल-लेझीम, टाळ-मृदंग, शिवशाहिरांचा जागर, शिरकाई देवीचा गोंधळ तसेच कीर्तन-भजनाचे कार्यक्रम रंगणार आहेत.
दि. 6 जून रोजी ध्वजारोहणाने मुख्य सोहळ्याला प्रारंभ होईल. त्यानंतर शाहिरी कार्यक्रम, शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे आगमन आणि राज्याभिषेक विधी पार पडणार आहेत. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते उत्सवमूर्तीला अभिषेक व सिंहासनारूढ मूर्तीवर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात येणार आहे.
यावेळी शिवभक्तांना मार्गदर्शन केल्यानंतर भव्य पालखी सोहळा काढण्यात येईल. जगदीश्वर मंदिर येथे पालखीचे आगमन झाल्यानंतर वारकरी संप्रदायाला पंढरपूर वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस अभिवादन करून सोहळ्याची सांगता होईल.
राज्यभरातील शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती सदस्य रोहित जाधव यांनी केले आहे.