सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी कराड तालुक्यातील सुपने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन आरोग्य केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली.
यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवा, रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणार्या सुविधा, औषध साठा, यामध्ये रेबीज लसीच्या औषधांचा साठा, सर्पदंश औषधांचा साठा, रिक्त पदांची माहिती, स्वच्छता व्यवस्था तसेच विविध आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचार्यांशी संवाद साधून त्यांनी कामकाजाबाबत माहिती घेतली.
पाहणीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाची पाहणी करून बांधकामांमध्ये येणार्या अडीअडचणींबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली व त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलवडे यांना सूचना दिल्या. तसेच आरोग्य केंद्रातील स्वच्छता, रुग्णसेवा व प्रशासकीय कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत डॉ. प्रिया शिंदे यांनी अधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तसेच रुग्णांना वेळेत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या भेटीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य धनंजय ताटे, सुपने गावच्या सरपंच विश्रांती पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित ठिगळे, सुपने गावातील ग्रामस्थ साहेबराव गायकवाड, विठोबा पाटील, प्रशांत पाटील तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.