सातारा पोलिस दलात बदल्यांचा मोठा फेरबदल; सहा नवे निरीक्षक जिल्ह्यात दाखल; आयजींचे आदेश

by Team Satara Today | published on : 01 June 2026


सातारा  : सातारा जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरीक्षक (पोनि) व सहाय्यक पोलिस निरीक्षक (सपोनि) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा फेरबदल करण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी रविवारी याबाबतचे आदेश जारी केले. या बदल्यांमुळे काही अनुभवी अधिकारी जिल्ह्याबाहेर गेले असले, तरी सातारा जिल्ह्याला सहा नव्या पोलिस निरीक्षकांची भर पडली आहे. तसेच काही अधिकाऱ्यांना त्यांच्या विद्यमान पदांवर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

जारी आदेशानुसार पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, सुनील शेळके आणि संदीप जगताप यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांची सांगली येथे नियुक्ती करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक दादाभाऊ पवार व वंदना श्रीसुंदर यांची पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, या बदल्यांमध्ये सातारा जिल्ह्याला सहा पोलिस निरीक्षकांची नियुक्ती मिळाली आहे. पोलिस निरीक्षक आण्णा पवार यांची पुणे ग्रामीण येथून, तर महेश इंगळे आणि सतीश होडगर यांची कोल्हापूर येथून सातारा जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. तसेच पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांची पुणे ग्रामीण येथून साताऱ्यात नियुक्ती झाली आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे जिल्हा पोलिस दलाची प्रशासकीय व कार्यक्षम ताकद अधिक बळकट होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

याशिवाय पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्ये वाहतूक शाखेचे सपोनि अभिजीत यादव आणि सपोनि अभिजीत चौधरी यांनाही एक वर्षाची मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे.

पोलिस दलातील या बदल्यांमुळे जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजात नव्या जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धतीला चालना मिळणार असून, आगामी काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने या बदल्यांना महत्त्वाचे मानले जात आहे


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तारळी धरणग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु; पुनर्वसनातील त्रुटी, संकलन यादी दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पुढील बातमी
सातारच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी विठ्ठल इनामदार; सोमवारी स्वीकारला पदभार; मल्लिकार्जुन माने यांच्या सेवानिवृत्तीनंतर नियुक्ती

संबंधित बातम्या