सातारा : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कार्यरत गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थकीत मानधनाच्या मागणीसाठी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनसारख्या महत्त्वाच्या योजनांच्या अंमलबजावणीत योगदान देणारे गट समन्वयक व समूह समन्वयक पदावरील कर्मचारी २०१२ पासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. मात्र डिसेंबर २०२५ पासून त्यांचे मानधन रखडल्याने अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात सुमारे साडेतीनशे कर्मचारी या समस्येने प्रभावित झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत थकीत मानधन तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष रोहित जाधव, राज्य सचिव जयंत वर्मा, जिल्हा सचिव फिरोज मुलाणी यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले आहेत. “मानधनाचा प्रश्न त्वरित निकाली काढला नाही तर पुढील आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल,” असे रोहित जाधव यांनी सांगितले.