सातारा : सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील विस्तारित गावठाणातील प्लॉट क्रमांक १५ वर झालेल्या कथित अतिक्रमणाच्या विरोधात बहुजन युथ पॅंथर संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला. संबंधित अतिक्रमण हटवून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
बहुजन युथ पॅंथरचे जिल्हाध्यक्ष अंकित वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राकेशभाई सुपारी यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंद्रे येथील विस्तारित गावठाणातील प्लॉट क्रमांक १५ वर आवश्यक शासकीय परवानग्या न घेता पत्र्याचे शेड उभारण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत महसूल विभागाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
अंकित वाघमारे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, संबंधित प्रकरणात काही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेले कथित बांधकाम तातडीने हटविण्यात यावे, संबंधित कराराची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास संघटनेच्या वतीने अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी बहुजन युथ पॅंथरच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.