सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपकडून धैर्यशील कदम यांची उमेदवारी जाहीर

by Team Satara Today | published on : 31 May 2026


सातारा : विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपचे माजी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची उमेदवारी जाहीर झाल्याने सातारा भाजपमध्ये धैर्य खुलले आहे. रात्री उशिरा त्यांच्या  नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

या मतदारसंघातून आपला प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी भाजपने आतापासूनच संपूर्ण ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. मतदारांची आकडेवारी पाहता साताऱ्यातून भाजप किंगमेकर ठरणार आहे. एकूणच महायुतीचे पारडे जड दिसत आहे. सातारा जिल्ह्यात एकूण 474 मतदार असून, त्यापैकी सर्वाधिक 210 मतदार एकट्या भाजपकडे आहेत. भाजपमधून विक्रम पावसकर, सुनील काटकर यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती. मात्र, यामध्ये धैयशील कदम यांनी बाजी मारली आहे. 

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे 105, तर शिवसेनेकडे (शिंदे गट) 38 मतदार आहेत, तसेच राष्ट्रवादीकडे (शरद पवार गट) पाच,काँग्रेसकडे सहा, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चार, तर आघाड्यांकडे 59 आणि अपक्ष 47 असे बलाबल सद्यःस्थितीत आहे. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील 59 आघाडीच्या मतांमध्ये भाजपचे 18 आणि शिंदे गटाचा एक मतदार सामील आहे, तसेच 47 अपक्ष मतदारांपैकी तब्बल 32 मतदार हे भाजप विचारसरणीचे, तर 10 मतदार शिंदेंच्या शिवसेनेच्या विचारांचे आहेत. ही सर्व आकडेवारी पाहता साताऱ्यात महायुती आणि विशेषतः भाजपचे पारडे जड आहे. त्यामुळे विरोधकांकडून कोण उमेदवार दिला जाणार याची उत्सुकता आहे. दुसरीकडे, सांगली जिल्ह्यात 389 मतदार असून, तेथे काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता
पुढील बातमी
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर काळाच्या पडद्याआड

संबंधित बातम्या