सातारारोड-किन्हई रस्त्यावर अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई; वाहनासह 2 लाख 79 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 31 May 2026


कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान सातारारोड-किन्हई रस्त्यावर पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करत वाहनासह 2 लाख 79 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोरेगाव पोलीसांनी संशयित आरोपी ओम अनिल भोसले, (वय 21, रा. भुईंज, ता. वाई) याच्यावर गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार कोरेगाव उपविभागात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधीर बनकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक कार्यरत आहे.

शुक्रवारी सातारारोड-किन्हई मार्गावरून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित मार्गावर सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनातून विदेशी दारूची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वाहनासह दारूचा साठा जप्त करण्यात आला.

या कारवाईत पोलिस अंमलदार सोमनाथ चव्हाण, सचिन भिलारे, प्रमोद जाधव, शुभम पवार, सतीश कर्पे, ज्ञानेश्वर यादव, रमेश बर्गे, अमोल जगदाळे व कृष्णा भोसले यांनी सहभाग घेतला. दरम्यान, तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधातील मोहीम आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असून अशा व्यवसायांवर सातत्याने कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी पाटील यांनी दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खेड ग्रामपंचायत अपहार प्रकरण: आमदार महेश शिंदेंवर भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा ग्रामस्थांचा आरोप
पुढील बातमी
साताऱ्यातील विसावा नाका येथील द लिटिल हार्ट कॅफेवर कारवाई; सहाजणांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या