खेड ग्रामपंचायत अपहार प्रकरण: आमदार महेश शिंदेंवर भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा ग्रामस्थांचा आरोप

by Team Satara Today | published on : 31 May 2026


सातारा: खेड ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अपहार प्रकरणात अपात्र ठरलेल्या सरपंच लता फरांदे यांना आमदार महेश शिंदे पाठीशी घालत असून, ते थेट भ्रष्टाचाराचे समर्थन करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पंचायत समितीचे माजी सभापती मिलिंद कदम, माजी सरपंच सुजीत पवार, पिंटू गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य निखिल यादव व सुमित भोसले यांनी एका पत्रकार परिषदेत हा आरोप केला.

​पत्रकार परिषदेत बोलताना ग्रामस्थांनी सांगितले की, खेड ग्रामपंचायतीत यापूर्वी स्व. अभयसिंहराजे भोसले (भाऊसाहेब महाराज) यांच्या विचारातून लोकहिताची मोठी कामे करण्यात आली. मात्र, गेल्या चार वर्षांच्या काळात ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विभागीय चौकशीनंतर सुमारे पावणे सतरा लाख रुपयांच्या आर्थिक अपहारप्रकरणी सरपंच लता फरांदे यांना पदावरून अपात्र ठरविण्यात आल्याने गावाची संपूर्ण राज्यभर बदनामी झाल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

​जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केली होती. या चौकशीत १२ पैकी ११ विकासकामांमध्ये आर्थिक अपहार झाल्याचा स्पष्ट अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या सुनावणीत सरपंचांना दोषी ठरविण्यात आले. त्यामुळे हा निर्णय कोणत्याही राजकीय दबावातून झालेला नसून, तो पूर्णपणे प्रशासकीय चौकशीच्या आधारेच झाला असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.

​यावेळी आमदार महेश शिंदे यांनी खेडच्या विकासाबाबत केलेले दावे ग्रामस्थांनी पूर्णपणे फेटाळून लावले. खेड गावाला राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला असताना, गावात घाणीचे साम्राज्य होते हा आमदारांचा दावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, येथील मेडिकल कॉलेजच्या उभारणीसाठी माजी आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​ग्रामस्थांनी पुढे बोलताना आमदार महेश शिंदे यांच्या सत्ताकाळात सरपंच आणि सदस्यांनी फ्लॅट व घरांच्या नोंदी, विविध कामांची बिले, टेंडरची टक्केवारी आणि नागरिकांच्या दाखल्यांचे दर यांचे एक प्रकारे 'रेटकार्ड'च तयार केल्याचा आरोप केला. या रेटकार्डची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महागाईच्या या काळात भरमसाठ घरपट्टी वाढवून नागरिकांना वेठीस धरले जात असून, करदात्यांच्या पैशांचा अपहार करून गावाची बदनामी करण्याचे काम झाले आहे, अशी भावना आता सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

​रस्ता काँक्रिटीकरणात कमिशन मिळते म्हणून खेडमध्ये रस्ते करण्यात आले, परंतु निकृष्ट दर्जामुळे ते काँक्रिटीकरण उखडून आता तिथे मोठे खड्डे पडले आहेत, तसेच कच्च्या गटारांसाठी लाखो रुपये खर्च केले तरी ती आज अस्तित्वात नाहीत, असा आरोपही यावेळी करण्यात आला. आयुक्तांच्या आदेशातील १२ कामांमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाला असतानाही लोकप्रतिनिधी विकासाच्या गप्पा मारत आहेत. ग्रामपंचायतीमधील पावणे सतरा लाखांचा हा आर्थिक अपहार केवळ एक 'ट्रेलर' असून, जनतेच्या करातील हडपलेल्या कोट्यवधी रुपयांचा 'पिक्चर' अजून बाकी आहे, तोही लवकरच पुराव्यांसह जनतेसमोर आणला जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. ग्रामनिधीतील भ्रष्टाचाराबाबत आमदारांनी दिलेले आव्हान आपण स्वीकारत असून, त्यांनी जागा आणि वेळ निश्चित करावी; आम्ही सर्व पुराव्यांसह या भ्रष्टाचाराची पोलखोल करू, असे प्रतिआव्हानही या पत्रकार परिषदेत देण्यात आले. या सर्व घडामोडींमुळे सध्या खेडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटप बंधनकारक; निकृष्ट कापड आढळल्यास कारवाई
पुढील बातमी
सातारारोड-किन्हई रस्त्यावर अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई; वाहनासह 2 लाख 79 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या