सातारा: घरी अठरा विश्व दारिद्र्य असताना एकीवमुरा (ता. जावली) या छोट्याशा खेडेगावातील गौरी बजरंग गोरे (वय २२) या युवतीने अनेक संकटांवर मात करत पोलीस भरतीत घवघवीत यश मिळवलं आहे. तिची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गौरी ही पोलीस दलात दाखल होणारी गावातील पहिली महिला ठरली आहे. माथाडी कामगार असलेल्या व अक्षरगंध नसलेल्या वडिलांच्या या जिद्दी लेकीने अभ्यासाच्या सोयी सुविधांचा अभाव, घरच्या बिकट परिस्थितीला प्रेरणा मानून पोलीस भरतीचे स्वप्न अखेर कवेत घेतले. कुटुंबाच्या कष्टांना अन् परिस्थितीच्या चटक्यांना तिनं कधीही कमजोरी मानलं नाही.
तिचे प्राथमिक शिक्षण एकीव येथे झाले असून तिने नसरापूर येथील शंकरराव भेलके महाविद्यालयात पुढील शिक्षण पूर्ण केले. अत्यंत बेताच्या परिस्थितीतही तिने पोलिस दलात भरती होण्याचा निर्णय घेतला. सतत अपयश व अनेक संकटे येऊन देखील ती खचली नाही. अडथळ्यांसोबत शर्यत सुरू होती. यश मिळवायचे असेल तर पावलांना थकून चालणार नाही हे तिने आपल्या मनाशी ठाम ठरवले होते. अखेर अडथळ्यांच्या या शर्यतीत गौरी विजयी झाली. पोलिस भरतीत यश मिळवत तिची मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे.
ज्यावेळेस मी निकाल पाहिला त्यावेळेस सर्वप्रथम माझ्यासमोर माझ्या वडिलांचा कष्ट करतानाचा चेहरा आला. मला शिकता यावं यासाठी घरच्यांनी प्रसंगी मोलमजुरी केली. त्यांनी खूप वाईट दिवस पाहिलेत, असे सांगत गौरीने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ग्रामीण भागातील मुलींनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी जिद्दीने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, हे गौरीने दाखवून दिले आहे.
लहानपणापासून गौरी अत्यंत हुशार होती. तिच्यात काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही तिने हार मानली नाही. गावच्या लेकीने मिळवलेले हे यश इतर मुलामुलींसाठी प्रेरणादायी आहे.
~ नामदेव गोरे, ग्रामस्थ