वाई : वाई शहरातील रामडोह आळी परिसरातील इंद्रजा आयकॉन इमारतीतील एका अनधिकृत गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत तब्बल ८०.७४ किलो प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. जप्त मालाची किंमत २ लाख ५९ हजार ४८४ रुपये इतकी असून याप्रकरणी सतीश पवार यांच्याविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती गायकवाड यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यवाही पूर्ण करून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलमे १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २६, २७, ३० व ५९ अन्वये गुन्हा दाखल केला. धाडीदरम्यान आरएमडी, विमल पान मसाला, टोबॅकोसह विविध प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गोदाम मालक सतीश पवार हे बाहेरगावी असल्याचे सांगून घटनास्थळी उपस्थित राहिले नाहीत. वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांच्या उपस्थितीत गोदामाचे कुलूप तोडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण माल जप्त करून गोदाम सीलबंद करण्यात आले.
दरम्यान, वाई पोलीस ठाण्याचे अधिकारी जितेंद्र शहाणे या प्रकरणाचा तपास करीत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती गायकवाड यांनी सहाय्यक आयुक्त एस. बी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.