फलटण : तालुक्यातील सस्तेवाडी गावच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर फलटण ग्रामीण पोलिसांनी शनिवारी (दि. ३०) रात्री मोठी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी सुमारे १ लाख १६ हजार रुपये किमतीचा दारू बनवण्याचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सस्तेवाडी गावामध्ये काही जण गावठी हातभट्टीची दारू गाळण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय आणि खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या पथकाने सस्तेवाडी गावच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अचानक छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी १६०० लिटर गुळाचे रसायन (मुरवण), दोन लोखंडी कढई आणि जळण असा एकूण १ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.
या बेकायदेशीर दारू निर्मितीप्रकरणी पोलिसांनी संजय श्याम पवार आणि अर्जुन श्याम पवार (दोघे रा. सोमवार पेठ, फलटण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस हवालदार अमोल जगदाळे, नितीन चतुरे, पोलीस कॉन्स्टेबल हणमंत दडस आणि तुषार नलवडे यांनी या धडक कारवाईत सहभाग घेतला. तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात अशीच कडक मोहीम यापुढेही सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला असून अवैध धंद्यांची माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.