कराड: कराड शहर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात धडक कारवाई करत वारुंजी फाटा येथे सापळा रचून तब्बल ९५.७८ ग्रॅम वजनाचे 'एम.डी.' (मेफेड्रोन) ड्रग्स जप्त केले आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ड्रग्स, तीन मोबाईल फोन आणि एक इनोव्हा कार असा एकूण १८ लाख ८२ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलिसांचे पथक अवैध एनडीपीएस कायद्यानुसार ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांवर पाळत ठेवून होते. दिनांक ३० मे २०२६ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. समीर गुलाब शेख (रा. कोयनावसाहत, कशल हाईट्स, कराड), नजर महम्मद आरिफ मुल्ला (रा. मुजावर कॉलनी, कराड) आणि फरदीन दादापीर शेख (रा. सूर्यवंशी मळा, कराड) हे तिघे जण एका इनोव्हा कारमधून वारुंजी फाटा येथे 'एम.डी. मेफेड्रोन' हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे कराड शहर पोलिसांच्या पथकाने वारुंजी फाटा परिसरात तातडीने सापळा रचला आणि संशयित इनोव्हा कार येताच त्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे २ लाख ८७ हजार ३४० रुपये किमतीचे ९५.७८ ग्रॅम वजनाचे एम.डी. मेफेड्रोन ड्रग्स आढळून आले. पोलिसांनी ड्रग्ससह गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार आणि तीन मोबाईल असा एकूण १८ लाख ८२ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६३८/२०२६ नुसार एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २१(क) आणि २९ प्रमाणे गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या धडक कारवाईत पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम, पोलीस अंमलदार वाडकर, पाटील, कुंभार, साळुंखे, स्वामी, कोरडे, सांडगे, मोरे, देशमुख, पवार, पिसाळ, विभुते, चव्हाण, मोमीन आणि चालक साळुंखे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत आहेत.