फलटण : जिल्ह्यात बेकायदेशीर अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक पथके तैनात केली होती. या मोहिमेला फलटण येथे मोठे यश आले असून, ४ किलो ६९ ग्रॅम गांजा, एक मोटारसायकल आणि दोन मोबाईल असा एकूण २ लाख १ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी दोन संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शुक्रवारी, दि. २९ मे रोजी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी सुरू होती. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून एक गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, मौजे धुळदेव (ता. फलटण) गावच्या हद्दीत असलेल्या रावरामोशी पुलाजवळील कॉर्नरवर दोन इसम बजाज प्लॅटिना मोटारसायकलवरून (क्र. MH 12 HX 2649) गांजा विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याचे समजले. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक परितोष दातीर आणि त्यांच्या पथकाने फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे यांच्या पथकाची मदत घेतली. दोन्ही पथकांनी संयुक्तपणे रावरामोशी पुलाजवळ सापळा रचून छापा टाकला. पोलिसांना पाहताच तेथे संशयास्पदरीत्या थांबलेल्या दोन इसमांची धावपळ उडाली, मात्र पोलिसांनी सतर्कतेने त्यांना जागीच ताब्यात घेतले.
त्या संशयितांची आणि त्यांच्या जवळील पिशवीची झडती घेतली असता, त्यात ४ किलो ६९ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी हा गांजा, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण २,०१,७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.
या धडक कारवाईत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, फलटणचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे, नितीन शिंदे, तसेच उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, आणि पोलीस अंमलदार मंगेश महाडिक, अमोल माने, अजय जाधव, जयवंत खांडके, अमित झेंडे, नवनाथ कदम, अजित कर्णे, अमित सपकाळ, ओंकार यादव, स्वप्निल दौंड, धिरज महाडिक, प्रविण पवार, संकेत निकम, विजय निकम, आनंदा भोये यांनी सहभाग घेतला. तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार रुक्मिणी माने, बापूराव धायगुडे, निखिल गायकवाड, गणेश आवघडे आणि अतुल बडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस प्रमुखांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे विशेष अभिनंदन केले आहे.