सातारा : सातारा तालुक्यातील यादववाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील बाजूस कृष्णा खोरे विभागाने केलेल्या खोदकामामुळे शाळांची सुरक्षा धोक्यात आली आहे. पावसाळ्यात शाळेच्या इमारतीसह विद्यार्थ्यांसाठी ही स्थिती गंभीर स्वरुपाची असून याबाबत प्रशासनाने तातडीने पाहणी करुन खोदकाम केलेल्या संपूर्ण परिसरास संरक्षण भिंत बांधून शाळा सुरक्षित करावी, अशी मागणी सरपंच, ग्रामसेवकांसह ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा तालुक्यातील यादववाडी, वाघवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या (कार्यकारी अभियंता कार्यालय) माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम अत्यंत खोल आणि धोकादायक स्वरूपाचे आहे.
या शाळेला अद्याप कोणत्याही प्रकारची मजबूत संरक्षण भिंत बांधलेली नाही. आगामी जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून, शाळेत लहान मुले-मुली शिक्षणासाठी पुन्हा येऊ लागतील. खेळताना किंवा मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांचा पाय घसरून या खोल खोदकामात पडण्याची आणि मोठी जीवितहानी होण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या पावसाळा तोंडावर असल्याने या खोदकामात पाणी साचून धोका अधिकच वाढणार आहे. अशा परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? हा संतप्त प्रश्न यादववाडी, वाघवाडीतील ग्रामस्थांना, पालकांनी उपस्थित केला आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा, प्रशासनाने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कृष्णा खोरे विभाग व संबंधित प्रशासनाने तातडीने स्वखर्चाने येथे मजबूत संरक्षण भिंत बांधावी तसेच शाळा सुरू होण्यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपातील बॅरिकेड्स किंवा सुरक्षा जाळी लावून तो भाग सुरक्षित करावा. याबाबत शाळा सुरु होण्यापूर्वी दखल न घेतली गेल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे बोसले, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कृष्णा खोरे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना देण्यात आल्या आहेत.