व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा ! ना. उदय सामंतांचा सातार्‍यातून थेट इशारा; महेश शिंदेंना कानमंत्र, जयकुमार गोरेंवर सूचक निशाणा

by Team Satara Today | published on : 29 May 2026


सातारा : व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो, असा थेट आणि ठाम संदेश देत राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी सातार्‍यातून महायुतीतील अंतर्गत कुरघोड्यांवर जोरदार भाष्य केले. फलटणमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी आमदार महेश शिंदे यांना अप्रत्यक्ष इशारा दिल्याची जोरदार चर्चा रंगली असून भाजप नेते जयकुमार गोरेंवरही नाव न घेता त्यांनी सूचक टीका केली.

शुक्रवारी सातारा दौर्‍यावर आलेल्या सामंत यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकीत पदाधिकार्‍यांना स्पष्ट शब्दांत पक्षशिस्तीचा इशारा दिला. पक्षविरोधी भूमिका घेणार्‍यांनाच माझा इशारा आहे, असे सांगत त्यांनी महायुतीत राहूनच परस्परांवर राजकीय कुरघोडी करणार्‍यांना लक्ष्य केले.

सामंत म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र महायुतीत समन्वय आणि परस्पर सन्मान आवश्यक आहे. सातारा आणि सोलापूरमध्ये कोणामुळे परिस्थिती निर्माण होते, हे जनतेलाही माहिती आहे. या वक्तव्यानंतर स्थानिक भाजप नेतृत्वावर, विशेषतः जयकुमार गोरेंवर त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मिठाचा खडा पडेल अशी भूमिका कोणी घेऊ नये, असे स्पष्ट आवाहन करत सामंत यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना संघटनात्मक निष्ठा जपण्याचे आदेश दिले.

सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील बीएलए नियुक्तीचा आढावा घेताना सामंत यांनी शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधोरेखित केली. वाई आणि सातारा मतदारसंघात नियुक्त्या पूर्ण झाल्याचा दावा करत निष्ठावान शिवसैनिकांनाच जबाबदारी दिली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. काही मतदारसंघांतील पदाधिकार्‍यांवर कारवाई किंवा बरखास्तीचे संकेतही त्यांनी दिले.

विधान परिषद निवडणुकीवर मोठा दावा

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बोलताना सामंत यांनी पुढील 24 तासांत चित्र स्पष्ट होईल, असे सांगत महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार अर्ज दाखल करतील, असा विश्‍वास व्यक्त केला. जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सामंत यांनी सरकार सकारात्मक असल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये, अशी भावनिक विनंती केली. सातार्‍यातील दौर्‍यातून उदय सामंत यांनी एकीकडे शिवसेनेची संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर थेट संदेश देत पक्षशिस्तीची स्पष्ट रेषा आखल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यात भटक्या-विमुक्त समाजाचे धरणे आंदोलन; पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण, जातप्रमाणपत्र आणि विकासाच्या मागण्या
पुढील बातमी
पोवईनाका परिसरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी युवकावर गुन्हा

संबंधित बातम्या