कराडमध्ये गांजा बाळगणारा आणखी एक गजाआड; ईदगाह मैदान परिसरातील झोपडपट्टीत छापा

छाप्यात 375 ग्रॅम गांजा मिळून आल्यानंतर अशोक बिराजदार याला अटक

by Team Satara Today | published on : 29 May 2026


कराड : चार दिवसापूर्वी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांकडून मिळालेल्या माहितीनंतर कराड शहर पोलिसांनी ईदगाह मैदान परिसरातील झोपडपट्टीत छापा टाकला. या छाप्यात 375 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला असून अशोक नंदाप्पा बिराजदार या संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्यास दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिला आहे.

मागील आठवड्यात 23 मे रोजी कराड शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी छापा टाकून तब्बल 2 लाख 1 हजार रुपयांचा 8 किलो 50 ग्रॅम गांजा जप्त केला होता. या प्रकरणी परवीन इब्राहिम पटेल (रा. इदगाह मैदान रोड, शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी, शनिवार पेठ, कराड) व तिचा साथीदार संदीप सतीश पाटील (वय 37, रा. सुपने, ता. कराड) या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोन्ही संशयितांकडे करण्यात आलेल्या चौकशीतून अशोक बिराजदार याचे नाव समोर आले होते. अशोक बिराजदार हा यापूर्वी अटक करण्यात आलेल्या परवीन पटेल हिचा नातेवाईक असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

संशयितांकडून मिळालेल्या माहितीची खात्री करत कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी ईदगाह मैदान परिसरातील झोपडपट्टी परिसरात छापा टाकला. या छाप्यात 375 ग्रॅम गांजा मिळून आल्यानंतर अशोक बिराजदार याला अटक करण्यात आले. आणखी कोणी साथीदार आहेत का याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महसूल ची नसती उठाठेव; पाचगणीतील बंगला पाडकाम येणार अंगलट
पुढील बातमी
साताऱ्यातील काँग्रेस भवन बाहेर असलेल्या 4 ते 5 टपऱ्या जळून खाक; व्यावसायिकांचे मोठे नुकसान

संबंधित बातम्या