महाबळेश्वर : मे महिन्यातील पर्यटन हंगामामुळे महाबळेश्वर शहरात पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली असताना वाहतूक नियंत्रणासाठी महाबळेश्वर पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलेले नियोजन पूर्णपणे ढिसाळ आणि निष्क्रिय ठरत असल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. रेड बटन हॉटेल ते माखरिया गार्डनपर्यंत तब्बल एक ते दीड तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
वाहतूक कोंडी इतकी भीषण होती की, अनेक वाहनांमधून ब्रेक आणि क्लच प्लेट जळल्याचा तीव्र वास येत होता. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना वाहनांतच तासनतास अडकून राहावे लागले. शहरातील मुख्य रस्त्यांवर अक्षरशः वाहनांचे समुद्र उसळलेले असताना काही होमगार्ड मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे वाहतूक नियंत्रणाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र होते.
हजारो पर्यटक वाहने शहरात दाखल झाली असताना वाहतूक नियंत्रणासाठी अवघे तीन पोलिस कर्मचारी, दोन होमगार्ड आणि नो-पार्किंगमध्ये उभी असलेल्या वाहनांना जॅमर लावण्यासाठी एक कर्मचारी एवढीच व्यवस्था तैनात असल्याचे दिसून आले.
वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, पर्यटकांची नाराजी
महाबळेश्वरसारख्या जागतिक पर्यटनस्थळी दरवर्षी पर्यटन हंगामात हीच परिस्थिती निर्माण होत असतानाही पोलिस प्रशासन कोणताही ठोस धडा घेत नसल्याची टीका होत आहे. लाखो रुपयांचा महसूल मिळवणाऱ्या पर्यटन शहरात वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. महाबळेश्वर पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पर्यटननगरीची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.