सातार्‍यात ईद-उल-अजहाचा जल्लोष; नमाजनंतर बंधुत्व आणि शांततेचा संदेश देत सर्वांच्या प्रगतीसाठी प्रार्थना

by Team Satara Today | published on : 28 May 2026


सातारा : शहरासह जिल्हाभरात मुस्लिम समाजाचा पवित्र सण ईद-उल-अजहा (बकरी ईद) गुरुवारी भक्तीभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच शहरातील प्रमुख मशिदी आणि ईदगाह परिसरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत विशेष नमाज अदा केली. नमाजवेळी देशात शांतता, समाजात सौहार्द आणि सर्वांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली.

सणानिमित्त नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करत एकमेकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. नमाजनंतर आलिंगन देत बंधुभावाचा संदेश देण्यात आला. घराघरांत विविध पारंपारिक खाद्यपदार्थांची मेजवानी पाहायला मिळाली. लहान मुलांमध्येही सणाचा विशेष उत्साह दिसून आला.

सातार्‍यातील बाजारपेठांमध्ये दिवसभर खरेदीसाठी गर्दी होती. कपडे, मिठाई आणि इतर वस्तूंच्या दुकानांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील विविध भागांत सामाजिक सलोखा आणि उत्सवी वातावरण अनुभवायला मिळाले.

दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा देत हा सण त्याग, मानवता आणि ऐक्याचा संदेश देणारा असल्याचे म्हटले आहे. समाजात परस्पर प्रेम आणि बंधुभाव अधिक दृढ व्हावा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता. संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र संपूर्ण सण कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माजी मंत्री महादेव जानकरांचा महागाई, शेतकरी व वंचितांसाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार; पाचगणीत राष्ट्रीय समाज पक्षाचे ‘सत्यशोधन शिबिर’ संपन्न
पुढील बातमी
साताऱ्यात सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चारजणांवर कारवाई

संबंधित बातम्या