पाचगणी : छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत पक्षाची वाटचाल चालू आहे. धर्म व जातीचे राजकारण करून आर्थिक विषमता संपणार नसून, आगामी काळात वाढती महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीची समस्या, स्त्रियांवरील अत्याचार, शिक्षण क्षेत्रातील समस्या आदी विषयांशी संबंधित पक्षाची भूमिका राहणार आहे. स्वाभिमानासाठी कोणत्याही तत्त्वाची तडजोड न करता सत्तेतून आपण बाहेर पडलो आहे, उपेक्षित, वंचित व शोषित सर्व घटकांना न्याय देण्यासाठी लढा चालूच ठेवणार आहे . कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगून पक्ष बांधणीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या दोन दिवशीय "सत्यशोधन शिबिरा"च्या समारोपप्रसंगी श्री जानकर बोलत होते.
समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांचे यंदा द्विशताब्दी वर्ष साजरे होत असून, त्यानिमित्त महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक विचार मंथन करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी "महात्मा फुले यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र", किसान सभेचे विजय जावंधिया यांनी "शेती धोरण आणि शेतकरी चळवळ", संजय आवटे यांनी "आम्ही महाराष्ट्रातील लोक", अर्थतज्ञ प्रा. नीरज हातेकर यांनी "ग्रामीण समाजाचे प्रश्न आणि धार्मिक व जातीय उन्माद", मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांनी "पुरोगामी महाराष्ट्राची दशा आणि दिशा" , हणमंत पाटील यांनी "समाज माध्यमे आणि राजकारण" तसेच कवी नितीन चंदनशिवे यांनी "चळवळ डेंजर हाय" या विषयांवर शिबिरातील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर, सिद्धाप्पा अक्कीसागर, बाळकृष्ण लेंगरे, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, सुशीला मोराळे, ज्ञानेश्वर सलगर, युवा अध्यक्ष अजित पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष तानाजी शिंगाडे यांच्यासह राज्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.