सातारा : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या १३९ तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ८७४ अशा एकूण १०१३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तसेच महिला आरक्षणाची सोडत विशेष ग्रामसभेत काढण्यात येणार आहे. तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - विशेष ग्रामसभेची सूचना देणे – ८ जून २०२६, विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढणे – १२ जून २०२६, प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता – १७ जून २०२६, प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करणे – १९ जून २०२६, हरकती व सूचना स्वीकारण्याचा कालावधी – १९ जून ते २५ जून २०२६, हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय – ३ जुलै २०२६, अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता – ८ जुलै २०२६, अंतिम प्रभाग रचना व आरक्षण प्रसिद्ध करणे – १० जुलै २०२६
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
सातारा तालुक्यात सर्वाधिक १४५ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण प्रक्रिया होणार असून कराडमध्ये १३३, पाटणमध्ये १२०, खटावमध्ये ११० आणि फलटणमध्ये १०२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच कोरेगाव ७८, वाई ७६, खंडाळा ६१, माण ६१, जावली ७९ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठीही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आरक्षण प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले असून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक तयारीला वेग येणार आहे.