सातारा : जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि कोयना धरणाचा विस्तीर्ण फुगवटा असलेल्या बामणोली येथील शिवसागर जलाशयातील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जलाशय मोठ्या प्रमाणावर आटला असून, यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. पाणी नसल्यामुळे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या बोटी आता चिखलात आणि कोरड्या जमिनीवर उघड्यावर पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जलाशयाचे पाणी आटल्यामुळे एकीकडे चिंतेचे वातावरण असताना, दुसरीकडे मात्र इतिहासप्रेमींसाठी एक आगळावेगळा ठेवा समोर आला आहे. अनेक दशकांपूर्वी कोयना धरणाच्या निर्मितीवेळी शिवसागर जलाशयाच्या पाण्याखाली गेलेली जुनी गावे, त्यांची घरे आणि जुनी मंदिरे आता पूर्णपणे उघडी पडली आहेत. पाण्याखाली गेलेल्या प्राचीन व ऐतिहासिक मंदिरांचे अवशेष आणि त्यांचे दगडी बांधकाम आता स्पष्टपणे दिसून येत आहे.
एकेकाळी गजबजलेली गावे कशी असतील, याची साक्ष देणारे घरांचे उंबरे, भिंती आणि इतर अवशेष पाहण्यासाठी स्थानिक नागरिक आणि परिसरातील लोक गर्दी करत आहेत. हे दृश्य भावुक करणारे आणि भूतकाळाची आठवण करून देणारे ठरत आहे. बामणोली हे कास पठार आणि तापोळा परिसराशी जोडलेले असल्याने येथे बारमाही पर्यटकांची रेलचेल असते.
शिवसागर जलाशयातील बोटिंग हा येथील स्थानिकांच्या उपजीविकेचा मुख्य साधन आहे. परंतु, पाणी ओसरल्याने बोटिंग पूर्णपणे बंद झाले आहे. परिणामी, बोट व्यावसायिक, हॉटेल चालक आणि लहान विक्रेते यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरात आता सर्वांनाच मान्सूनच्या आगमनाची आणि दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.