बोगदा परिसरात पालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा; नागरिकांकडून स्वयंस्फूर्त सहकार्य, ; पुढील कारवाई राधिका रोडवर होण्याची शक्यता

by Team Satara Today | published on : 27 May 2026


सातारा : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला आता नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. समर्थ मंदिर चौक ते बोगदा परिसरात बुधवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान अनेक नागरिकांनी स्वतःहून रस्त्यालगतची अतिक्रमणे हटवून प्रशासनाला सहकार्य केल्याचे दिसून आले.

पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने गेल्या दोन दिवसांपासून या भागात जोरदार कारवाई सुरू ठेवली आहे. रस्त्यालगत उभारलेले कट्टे, पत्र्यांचे शेड, पायर्‍या, संरक्षक भिंती तसेच गटारांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील रस्ते अधिक मोकळे दिसू लागले असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बुधवारी मोहिमेसाठी दोन जेसीबी, दोन डंपर, कटर मशीन आणि सुमारे वीस कर्मचार्‍यांची यंत्रणा तैनात करण्यात आली होती. दुपारी बारा ते चार या वेळेत कारवाई पार पडली. विशेष म्हणजे, संपूर्ण मोहिम शांततेत पार पडली असून कुठेही विरोध किंवा तणावाची परिस्थिती निर्माण झाली नाही.

काही प्रतिष्ठित मिळकतधारकांनी त्यांच्या इमारतींसमोरील पायर्‍या व भिंती स्वतः हटवून प्रशासनाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. शहर विकासासाठी रस्ते मोकळे होणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असल्याचेही यावेळी दिसून आले.

नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ऍड. दत्ता बनकर तसेच सत्ताधारी पदाधिकार्‍यांनी अतिक्रमणमुक्त शहरासाठी कठोर निर्णय घेण्याची भूमिका स्पष्ट केल्याने प्रशासन अधिक सक्रिय झाले आहे. मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी मोहिमेचा पुढील टप्पा राबविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, बोगदा परिसरातील कारवाई पूर्णत्वाकडे जात असताना पालिकेची पुढील मोहीम राधिका रोड परिसरात सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे शहरातील इतर भागांतील अतिक्रमणधारकांमध्येही हालचाली वाढल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तीन पानी जुगार खेळताना सात जण ताब्यात; वाठार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, 3 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त
पुढील बातमी
वृद्धाला मारहाण केल्याप्रकरणी वर्णे येथील महिलेवर गुन्हा

संबंधित बातम्या