दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरे गटाचा सातार्‍यात एल्गार; महायुती सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी

पेपरफुटी, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरधरले धारेवर

by Team Satara Today | published on : 27 May 2026


सातारा : राज्यात वाढत चाललेली महागाई, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीची प्रकरणे तसेच महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बुधवारी सातार्‍यात तीव्र आंदोलन छेडले. शहरातील मोती चौक परिसरात झालेल्या या आंदोलनात महायुती सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार खासदार अनिल देसाई, उपनेते नितीन बानगुडे पाटील आणि जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शहरप्रमुख प्रणव सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडल्याचा आरोप करण्यात आला. तसेच वारंवार समोर येणार्‍या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.

महिला आणि लहान मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत सरकारकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनावेळी विविध घोषणांनी मोती चौक परिसर दणाणून गेला.

सरकारच्या कारभाराविरोधात प्रतीकात्मक निषेध म्हणून नागरिकांना मेलडी’ चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या आंदोलनात शिवा आरोग्य सेना जिल्हाप्रमुख निमिष शहा, तालुकाप्रमुख रमेश बोराटे, गणेश अहिवळे, अतिश ननावरे, रविराज बडदरे, शैलेश बोडके, शिवेंद्र ताटे, प्रशांत इंगळे, तेजस पिसाळ, आशिष पाटणे, जितू कांबळे, सुनील भोसले, अभिषेक भुजबळ, मोहित शहा, सुमित नाईक, अमोल कोंढाळकर यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विहिरीत बुडल्याने चिमुकल्याचा मृत्यू; आईची प्रकृती स्थिर
पुढील बातमी
तीन पानी जुगार खेळताना सात जण ताब्यात; वाठार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, 3 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या