दहिवडी : एका चिमुकल्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विहिरीत मुलासोबत पडलेल्या आईची प्रकृती स्थिर आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उकिर्डे, ता. माण येथे आईसोबत विहिरीवर गेलेल्या चारवर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हितांशु महावीर कांबळे असे बालकाचे नाव आहे. 24 मे रोजी सकाळी आठ वाजून 20 मिनिटांच्या सुमारास हितांशु हा त्याची आई शिवानी कांबळे यांच्यासह गावातील पंजाबराव जगदाळे यांच्या विहिरीवर गेला होता. यावेळी आई आणि मुलगा हे दोघेही अचानक विहिरीतील खोल पाण्यात पडले. या घटनेनंतर दोघांनाही तातडीने विहिरीबाहेर काढून उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, हितांशुची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आईची प्रकृती सध्या स्थिर आहे.
या प्रकरणी जितेंद्र कांबळे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार नीलम रासकर करीत आहेत.