सातारा : बारा लाख रुपये किंमतीचे गहाळ अथवा चोरीस गेलेले 40 मोबाईल मूळ मारताना फलटण शहर पोलीस ठाण्याकडून परत देण्यात आले. हे मोबाईल फलटण शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने विविध जिल्ह्यांसह परराज्यातून हस्तगत केले होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीइआयआर पोर्टलच्या माध्यमातून गहाळ मोबाईल शोधण्याबाबत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सूचना केल्या होत्या.
त्यानुसार फलटणचे पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सीइआयआर पोर्टलच्या माध्यमातून कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगणा या परराज्यांसह महाराष्ट्रातील कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, धुळे आणि पुणे जिल्ह्यातून गहाळ मोबाईलचा शोध घेऊन सुमारे 12 लाख रुपये किंमतीचे 40 मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले.
हे मोबाईल फलटण शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपाधीक्षक विशाल खांबे, तहसीलदार अभिजीत जाधव, फलटण शहरचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आले. यावेळी उपस्थितांनी मोबाईल परत मिळाल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे कौतुक केले.
सन 2024 ते आजअखेर गहाळ झालेले 455 मोबाईल फलटण शहर पोलीस ठाण्याला मूळ मालकांना परत देण्यात यश आले आहे.
या मोबाईल शोध कारवाई मध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे, सीइआयआर पोर्टलचे काम पाहणारे स्वप्निल खराडे, राणी फाळके, महेश जगदाळे, जितेंद्र टिके, मुकेश घोरपडे, अतुल बडे यांनी सहभाग घेतला.