जावळी तालुक्यातील कुडाळमध्ये धोम उजवा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी वाया; शेतकरी संतप्त

ग्रामस्थ आणि शेतकर्‍यांनी पाटबंधारे विभागाविरोधात संताप व्यक्त केला

by Team Satara Today | published on : 26 May 2026


सातारा : जावळी तालुक्यातील कुडाळ येथे धोम धरणाचा उजवा कालवा अचानक फुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कालवा फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारावर स्थानिक शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

गेल्या 24 तासांपासून कालव्यातून पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे. हे पाणी थेट रस्त्यांवर आल्यामुळे कुडाळ-मेढा-पाचगणी मार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की, तब्बल 5 किलोमीटर परिसरामध्ये हे पाणी पसरले असून, परिसरातील काही स्थानिक ओढेही तुंबल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अनेक भागांत पाण्याची टंचाई भासत आहे. अशा दुष्काळी आणि कडक उन्हाळ्याच्या परिस्थितीत लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकर्‍यांनी पाटबंधारे विभागाविरोधात संताप व्यक्त केला आहे. कालव्यांच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे.

पाटबंधारे विभागाने तातडीने या ठिकाणी धाव घेऊन कालव्याची गळती थांबवावी आणि युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेऊन पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सर्व स्तरावर अपयशी भाजप सरकार विरोधात जिल्ह्यात 29 रोजी राष्ट्रवादीचे तीव्र आंदोलन; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी भवन कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
पुढील बातमी
बारा लाखांचे 40 मोबाईल मूळ मालकांना परत ; फलटण शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

संबंधित बातम्या