सातारा : आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातामुळे सातारा जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी मृत तरुणांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या दुर्घटनेत आठ युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मर्ढे, आसगाव आणि खटाव परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकांच्या घरी जाऊन उदयनराजेंनी कुटुंबीयांशी संवाद साधला. अचानक कोसळलेल्या या दुःखामुळे हतबल झालेल्या नातेवाईकांना त्यांनी धीर देत भावनिक शब्दांत आधार दिला. कुटुंबावर ओढवलेली ही वेळ अत्यंत कठीण आहे. या दुःखात मी त्यांच्या सोबत कायम उभा राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रविवारी मध्यरात्री आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ वाहन खोल दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली होती. या अपघातात उत्कर्ष शिंगटे, प्रवीण शिंगटे, महेश पवार, आदित्य साळुंखे, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे, अंश चव्हाण आणि संदीप काटकर या आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला असून गावागावांतून हळहळ व्यक्त होत आहे.
सांत्वन भेटीदरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत युवकांना श्रद्धांजली वाहिली. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर वातावरणात प्रचंड हळहळ दिसून येत होती. गावकर्यांनीही या दुर्घटनेनंतर आंबेनळी घाटातील सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे हाताळण्याची मागणी केली.
यावेळी उदयनराजे भोसले यांनीही घाटातील अपघातांच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
या घटनेनंतर आंबेनळी घाटातील सुरक्षा, संरक्षण भिंती, इशारा फलक आणि धोकादायक वळणांवरील उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.