सातारा : सातारा शहराला दररोजचा पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावात सद्य:स्थितीत ४३ फूट पाणीसाठा शिल्लक असून, हा साठा आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेसा असला तरी नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. यावर्षी प्रचंड प्रमाणात उष्णता असल्याने आत्तापर्यंत एकूण पाणी पातळीत १८ फूट घट झाली आहे.
दीड महिन्यापूर्वी एकंदर बारा फूट पाणी पातळीत घट झाली होती. सद्य:स्थितीला सहा फूट पाणी पातळीत अधिक घट होऊन एकूण एकंदर आत्तापर्यंत १८ फुटापर्यंत घट झाली आहे. तलावाच्या पाणी पातळीत रोज वेगाने घट होत असली तरी शिल्लक असणारे पाणी मुबलक प्रमाणात धरणात आहे; परंतु हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा पावसाचे कमी राहणारे प्रमाण लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घेणे गरजेचे आहे.
कास धरणाची उंची वाढविल्याने २०२३ पासून मृत पाणीसाठा पावणे अठरा फूट व ६१.०४८ फूट उपयुक्त पाणीसाठा असा एकूण ७८.७२० फूट पाणीसाठा दरवर्षी धरणात होत आहे. जुन्या धरणात ११२२.४० मीटरपर्यंत पाणी अडवले जात होते. २०२२ मध्ये धरण पूर्ण झाल्यावर ११३०.५० मीटरपर्यंत पाणीसाठा झाला, तर दोन वर्षांपासून ११३४ मीटरपर्यंत पाणीसाठा होऊन जुन्या धरणाच्या पाणीसाठ्याच्या पाचपट अतिरिक्त पाणीसाठा क्षमता झाली.
सातारकरांना जूनअखेरपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकेल
कास धरणाची उंची वाढवल्यानंतर पूर्वीच्या पाणी साठवण क्षमतेपेक्षा २०२६ मध्ये साडेसव्वीस फुटाने अधिक पाणीसाठा वाढून ३७५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला. मागील दोन वर्षांपासून ११३४ मीटरपर्यंत पाणीसाठवण झाल्याने साडेअकरा फूट अधिक पाणीसाठा वाढून (५०० दशलक्ष घनफूट) अर्धा टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामुळे पाऊस लांबला तरीही सातारकरांना जूनअखेरपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकेल.
गेली दीडशे वर्ष ०.१ टीएमसी होणारा पाणीसाठा मागील दोन वर्षांपासून ०.५० टीएमसी होत आहे. आत्तापर्यंत एकूण १८ फूट पाणी पातळीत घट झाली असून, सद्य:स्थितीला धरणात ४३.०४८ फूट पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाटकरी जयराम किर्दत यांनी सांगितले.