सातारा : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीच ही निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये ही निवडणूक जिंकण्यासाठी शशिकांत शिंदे हेच सक्षम उमेदवार असल्याचे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या या जागेसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले असून, पक्षाने ही जागा सातत्याने जिंकली आहे. मात्र, सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्ष दोन वेगवेगळ्या गटांत विभागला गेला आहे. यामुळे मतांचे गणितही विभागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा अत्यंत चुरशीच्या आणि कठीण परिस्थितीत निवडणूक लढवायची आणि ती जिंकायची असेल, तर सर्व पातळ्यांवर सक्षम असणारा आणि इतर पक्षांतील नेत्यांशी उत्तम समन्वय साधून मतांची बेरीज करणारा उमेदवार असणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीमधील इतर पक्षांचे नेते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे बहुतांश मतदार हे शशिकांत शिंदे यांच्या आश्वासक व सर्वसमावेशक नेतृत्वाला सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतात, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.
भाजपसारख्या बलाढ्य पक्षाशी थेट मुकाबला करण्यासाठी इतर कोणत्याही उमेदवारापेक्षा शशिकांत शिंदे हेच योग्य पर्याय ठरू शकतात, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या सर्व राजकीय बाबींचा सखोल विचार करून शशिकांत शिंदे यांनीच विधान परिषदेची उमेदवारी स्वीकारावी, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते नवनाथ साबळे, गिरीश फडतरे, विनायक बर्गे, विनोद पवार व इतर कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.