महाबळेश्वर: पोलादपूर-आंबेनळी घाट मार्गावर रविवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे एक स्कॉर्पिओ गाडी सुमारे ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात गाडीतील आठही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत झालेले सर्व युवक सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव परिसरातील राहणारे असल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ११ डीएन २३४० क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी रविवारी रात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाटातून जात होती. घाटातील एका तीव्र वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट शेकडो फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भयानक होता की, गाडीचा पूर्णपणे चुराडा झाला आणि गाडीत प्रवास करणाऱ्या सर्वच जणांनी घटनास्थळीच प्राण गमावले.
रात्रीचा दाट अंधार, खोल दरी आणि दुर्गम परिसर यामुळे सुरुवातीला मदतकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, महाबळेश्वर ट्रेकर्स, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी पहाटे सहा वाजल्यापासून चार स्वतंत्र बचाव पथकांनी युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. दुर्गम भागात उतरून मृतदेह बाहेर काढण्याचे अत्यंत आव्हानात्मक काम या पथकांनी केले.
या भीषण अपघातात कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील महेश अनिल पवार (वय २५), आदित्य अशोक साळुंखे (२१), रितेश राजेंद्र लोखंडे (२५), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), अंश समीर चव्हाण (१८), उत्कर्ष आनंद शिंगटे (२१), अनिल अभिमन्यू शिंगटे (२५) आणि नितीन किसन नायकोंडे (३५) या आठ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच गावातील आठ तरुण मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने आसगाव परिसरासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.