कराडमध्ये 8 किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक, डीवायएसपी कार्यालय व कराड शहर पोलीसांची संयुक्त कारवाई

by Team Satara Today | published on : 24 May 2026


कराड : येथील  छत्रपती शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरातून पोलिसांनी छापा टाकून 2 लाखांचा 8 किलो गांजा जप्त केला. जिल्हा पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत कराड उपविभागीय पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली. 

गांजा विक्री प्रकरणी एका महिलेसह तिच्या साथीदारावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. परवीन इब्राहिम पटेल (रा. इदगाह मैदान रोड, शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी) व तिचा साथीदार संदीप सतीश पाटील, (वय 37 रा. सुपने ता. कराड) असे अटक केलेल्यांचे नाव आहे. पोलीस हवालदार सागर बर्गे यांनी तक्रार दिली.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कराड शहरातील इदगाह मैदान रोड, शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी, शनिवार पेठ येथे परवीन पटेल व तिचा साथीदार संदीप पाटील हे दोघे गांजा विक्री करत आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांना दि. २३ मे रोजी मिळाली. त्यानुसार राजश्री पाटील यांच्या आदेशाने सपोनि निलेश तारू यांच्या अधिपत्याखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व कराड शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने शनिवारी शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरात छापा टाकला. या कारवाईत 8.050 किलो वजनाचा 2 लाख 1 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस हवालदार असिफ जमादार, प्रवीण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी, स्वप्नील साबळे, मयुर देशमुख, मारुती लाटणे व महिला पोलीस कॉन्स्टेबल सरिता मोहिते यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यातील आपत्ती काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम; ना. मकरंद पाटील यांची माहिती, मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
पुढील बातमी
सातारा नगर परिषद प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सम्यक सबनीसचे शतक; ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांच्या हस्ते सम्यकला सामनावीर पुरस्कार

संबंधित बातम्या