सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आपत्ती काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ उभारण्याचे निर्देश देत सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारी अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा, असे स्पष्ट सांगितले. आपत्ती काळात जलद प्रतिसाद, नागरिकांपर्यंत तातडीची मदत आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
ना. मकरंद पाटील यांनी राज्य शासनाने अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी राबवलेल्या मदत उपाययोजनांची माहिती देताना शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयांचा आढावा मांडला. शेती, घर, पशुधन व मनुष्यहानीचे पंचनामे पूर्ण करून विशेष पॅकेज मंजूर करण्यात आले असून खरीप हंगामासाठी प्रति हेक्टर 10 हजार रुपयांची मदत, वाहून गेलेल्या जमिनीसाठी 47 हजार रुपयांपर्यंत भरपाई तसेच रोजगार हमी योजनेतून अतिरिक्त अनुदान देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील 1.06 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे तब्बल 16 हजार 224 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती देत आपत्ती काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास ना. मकरंद पाटील यांनी व्यक्त केला. तसेच एल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई, चारा छावण्या आणि ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत व पुनर्वसन विभाग पूर्ण तयारीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ना. गिरीश महाजन यांनी धरण विसर्ग, पूरस्थिती आणि धोकादायक पुलांबाबत प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, एनडीआरएफ, लष्कर, नौदल, हवामान विभाग तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.