सातारा : ''प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित जनसंपर्क ठेवून पक्ष संघटना वाढविण्यावर भर द्यावा. जिल्ह्यात पक्ष वाढविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची असून त्यासाठी प्रत्येकाने सक्रिय होणे गरजेचे आहे. जनतेशी सातत्याने संपर्क ठेवा. आगामी काळात पक्ष नेतृत्वाकडून प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम केले जाईल,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.
शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, ''आक्रमक आणि सक्षम विरोधक म्हणून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या भागात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सातत्याने काम करणे आवश्यक आहे.''
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पूर्णनिरीक्षण कार्यक्रमाबाबत सूचना देताना प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या गावातील बूथवरील मतदार यादीचे काम अत्यंत बारकाईने करण्याचे आवाहन केले.
बैठकीत विविध जिल्हास्तरीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. युवक अध्यक्षपदी समीर घाटगे, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षपदी सचिन जाधव, युवती अध्यक्षपदी कोमल घोरपडे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्षपदी शफिक शेख, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्षपदी बाळासाहेब घोरपडे, वाहतूक विभाग सेल अध्यक्षपदी संजय पिसाळ, इतर मागासवर्गीय सेल अध्यक्षपदी अनिल लोहार तसेच कामगार सेल अध्यक्षपदी किरण राऊत यांची निवड करण्यात आली. काही जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीच्या निवडीदेखील जाहीर करण्यात आल्या असून उर्वरित निवडी येत्या आठ दिवसांत करण्यात येणार असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.
बैठकीस जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सतीश चव्हाण, नरेश देसाई, प्रवीण धस्के, गोरखनाथ नलवडे, घनश्याम शिंदे, रमेश धायगुडे पाटील, ॲड. निलेश डेरे, संतोष पवार, नितीन शिंदे, अतुल शिंदे, सचिन जाधव, शफिक शेख, सागर झणझणे, अनिल लोहार, शंभू खलाटे, समीर घाटगे, नंदकुमार मोरे, समिंद्रा जाधव, सुवर्णा पाटील, संगीताताई साळुंखे, डॉ. सतीश बाबर, नलिनी जाधव, उमेश देशमुख, सुनिल काळेकर, शैलजा कदम, पूजा काळे, कोमल घोरपडे, तेजस्विनी केसरकर, बाळासाहेब खलाटे, निलेश जगदाळे, बाळासाहेब फडतरे, किरण चौधरी, मंगेश ढाणे, पूजा बनसोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.