भाजप नगरसेवकांना दोन्ही राजेंची तंबी; अंतर्गत वाद बाजूला ठेवा; विकासकामांवर लक्ष केंद्रित करा

by Team Satara Today | published on : 24 May 2026


सातारा : सातारा पालिकेतील वाढत्या अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांची रविवारी फर्न हॉटेल येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संयुक्तपणे उपस्थित नगरसेवकांना संघटनात्मक शिस्त, समन्वय आणि विकासाभिमुख कामकाजाचा स्पष्ट संदेश दिला.

पालिकेतील काही विषयांवरून नगरसेवकांमध्ये वाढत असलेल्या कुरबुरी, गटबाजी आणि परस्परांवरील आरोपांमुळे पक्षप्रतिमेवर परिणाम होत असल्याची नाराजी बैठकीत व्यक्त करण्यात आली. आगामी काळात निवडणुकांचे आव्हान लक्षात घेता सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नगरसेवकांना संबोधित करताना, “पालिका सभागृहातील मतभेद सार्वजनिक पातळीवर जाणे योग्य नाही. विषयांवर चर्चा व्हावी; मात्र त्यातून पक्षाची प्रतिमा मलीन होता कामा नये,” असे सांगितले. नवीन नगरसेवकांना मार्गदर्शन करून त्यांना कामकाजात सामावून घेण्याचाही त्यांनी सल्ला दिला.

पालिकेतील प्रशासनिक बाबींमध्ये अनावश्यक हस्तक्षेप टाळण्याचे निर्देश देतानाच मुकादम बदल्या आणि स्थानिक पातळीवरील तणावांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “विकासकामे आणि नागरी सुविधा यावर भर द्या. परस्परांतील संघर्षामुळे नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जातो,” असे ते म्हणाले.

शहरातील अतिक्रमण, हॉकर्स, स्वच्छता व्यवस्था आणि आर्थिक अडचणी या विषयांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शहरासाठी स्वतंत्र हॉकर्स झोन उभारणे, महसूल वाढवण्यासाठी स्वनिधी बळकट करणे आणि विविध विकास योजनांसाठी राज्य व केंद्र शासनाचा निधी मिळवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरसेवकांना नागरिकांशी अधिक संवाद ठेवण्याचे आवाहन केले. “प्रत्येक प्रभागात स्थानिक पातळीवर समित्या कार्यरत करून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून विकासकामे गतीने पूर्ण करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.

बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दाही उपस्थित झाला. संबंधित ठेकेदारांकडून कामगार महिलांना वेळेवर आणि योग्य मोबदला मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्वच्छता व्यवस्थेचे नियोजन अधिक सक्षम पद्धतीने करण्यासाठी नवीन यंत्रणा उभारण्याचा विचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

यानंतर दोन्ही राजांनी पालिका अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेत विविध प्रलंबित कामांचा आढावा घेतला. प्रशासनाने अधिक समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा भाजपमध्ये संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.


विधान परिषदेची निवडणूक : जिल्ह्यातून दोघांची नावे पाठवली 

सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थांची विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यातून लोकसभा संयोजक सुनील काटकर आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष द्यायचे कदम या दोघांची नावे पाठवण्यात आली आहेत. ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार व शिवसेनेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणारी याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीतून होणार आहे. सातारा जिल्ह्यातून सध्या तरी दोघांची नावे पाठवण्यातआल्याचे स्पष्टीकरण शिवेंद्रसिंह राजे यांनी दिले .


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवा नेते समीर घाटगे यांच्यावर सातारा राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी
पुढील बातमी
वाई तालुक्यात घोरपडीच्या अवयवांची तस्करी उघड; दोघांना अटक, तीन दिवसांची वनकोठडी

संबंधित बातम्या