सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने सातारा जिल्ह्यात युवा नेतृत्वाला बळ देत समीर चंद्रकांत घाटगे यांची युवक जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या पुरोगामी विचारसरणीवर ठाम राहून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने काम करणारे समीर घाटगे यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या स्वाक्षरीने समीर घाटगे (रा. मोळ, ता. खटाव) यांना हे अधिकृत नियुक्ती पत्र सातारा येथील 'राष्ट्रवादी भवन' येथून जाहीर करण्यात आले आहे. या नियुक्तीची घोषणा होताच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवा वर्गाने सोशल मीडियासह विविध माध्यमांतून जल्लोष साजरा करत त्यांचे स्वागत केले.
समीर घाटगे यांनी गेल्या काही वर्षांत युवकांमध्ये पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी अत्यंत सक्रिय भूमिका बजावली आहे. विशेषतः शरद पवार यांच्या सर्वसमावेशक राजकारणावर विश्वास ठेवून त्यांनी सातारा जिल्ह्यात युवकांचे मोठे संघटन उभे केले आहे. त्यांच्या याच सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास व्यक्त करत ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी नियुक्ती पत्राद्वारे समीर घाटगे यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, आगामी काळात पक्षाचे विचार तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्षवाढीसाठी ते सातत्याने प्रयत्न करतील, अशी अपेक्षा पक्ष नेतृत्वाने व्यक्त केली आहे. समीर घाटगे यांच्या या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या युवा संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असून, आगामी काळात युवक संघटना अधिक मजबूत होण्यास मोठी मदत होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.