सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मतदारसंघावर दावा सांगत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे. मतदारसंघाच्या जागावाटपाबाबत अद्याप महायुतीकडून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसला तरी राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दुसरीकडे, या मतदारसंघात भाजपचे मतदार संख्याबळ अधिक असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे महायुतीत ही जागा भाजपलाच मिळावी, यासाठी पक्षाच्या नेत्यांनीही जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. मतदारसंख्येच्या आधारावर भाजपने आपली भूमिका ठामपणे मांडण्याची तयारी केली आहे.
‘सांगली-सातारा’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि. १ जून आहे. उमेदवारी अर्जाची छाननी २ जून रोजी, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख दि. ४ जून आहे. मतदान दि. १८ जून रोजी, तर मतमोजणी २२ जून रोजी आहे. सध्या या मतदारसंघात भाजपकडे ३१४, राष्ट्रवादी (अजित पवार) २०५, राष्ट्रवादी शरद पवार ११९, शिंदेसेना १११, काँग्रेस ७३ असे संख्याबळ आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखण्याचे आव्हान असताना सांगली-सातारा मतदारसंघामुळे जागावाटपाचा पेच निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. अंतिम निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून होणार असला तरी उमेदवारीच्या दावेदारीवरून आतापासूनच राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुतीतही जागा अखेर कोणाच्या वाट्याला जाते आणि उमेदवारी कोणाला मिळते, याकडे आता स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जागा राष्ट्रवादीचीच : पद्माकर जगदाळे
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा राष्ट्रवादीचाच आहे. आतापर्यंत या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवारच निवडून येत होता. गत निवडणुकीतही राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात होता. भाजपने या मतदारसंघात कधीच निवडणूक लढविलेली नाही. त्यामुळे आम्ही हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. तसेच खा. पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचीही भेट घेतली आहे, असे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी सांगितले.