सातारा : सातारा शहर परिसरात अल्पावधीत तीन जण बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तक्रारी शाहूपुरी आणि सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या असून पोलिसांकडून विविध पथकांच्या माध्यमातून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.
शनिवार पेठेतील सोन्या मारुती चौक परिसरात वास्तव्यास असलेले उदयसिंह किसनराव गायकवाड (३७) हे २१ मे रोजी सकाळी घराबाहेर पडले होते. मित्राला भेटून परत येतो असे सांगून ते निघाले; मात्र त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. कुटुंबीयांनी नातेवाईक व परिचितांकडे चौकशी केली, मात्र कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर पत्नी निकिता गायकवाड यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
दुसऱ्या घटनेत पिल्लेश्वरी नगर भागातील १७ वर्षीय मुलगी घरातून अचानक निघून गेल्याचे समोर आले आहे. दुपारच्या सुमारास ती कोणालाही माहिती न देता घराबाहेर पडली होती. बराच शोध घेऊनही ती सापडली नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली.
तर क्षेत्रमाहुली परिसरातील सुवर्णा निरंजन जाधव (३७) या महिला रात्री फिरण्यासाठी बाहेर गेल्यानंतर घरी परतल्या नाहीत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तिन्ही घटनांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.