तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; साताऱ्यात युथ पॅंथरची निदर्शने, न्यायव्यवस्था आणि शासनाच्या भूमिकेविरोधात संताप

by Team Satara Today | published on : 22 May 2026


सातारा : तरुणांविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ युथ पॅंथर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी साताऱ्यात अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. प्रतीकात्मक स्वरूपात झुरळाचा वेश परिधान करून कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत न्यायव्यवस्था आणि शासनाच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला.

या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष अक्षय कांबळे यांनी केले. “देशातील तरुणांना कमी लेखणारी भाषा कोणत्याही जबाबदार पदावरील व्यक्तीकडून अपेक्षित नाही,” असे सांगत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आंदोलनात पूजा बनसोडे, आदित्य गायकवाड, संदीप जाधव, अजय गाडगे, राज काकडे, जुबेर शेख यांच्यासह अनेक युवक सहभागी झाले होते.

आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात तरुणांच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये टाळण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच युवकांना शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणींबाबतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, विविध रोजगार व स्वयंरोजगार योजनांसाठी अर्ज करताना युवकांना कर्ज प्रक्रियेमधील विलंब, जाचक कागदपत्रे आणि प्रशासकीय अटींचा मोठा सामना करावा लागत आहे. योजनांची घोषणा मोठ्या प्रमाणावर केली जाते; मात्र प्रत्यक्षात अनेक पात्र युवक लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, झुरळाचा पोशाख परिधान करून करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले असून शहरात दिवसभर या आंदोलनाची चर्चा सुरू होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नीट पेपरफुटीप्रकरणी काँग्रेस कार्यकारिणीचे साताऱ्यात निषेध आंदोलन; पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
पुढील बातमी
बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील, तात्पुरत्या कत्तलखान्याला सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या

संबंधित बातम्या