लाच प्रकरणी सिव्हीलच्या सहाय्यक अधीक्षकाला कोठडी; साताऱ्यातील धडक कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली

by Team Satara Today | published on : 22 May 2026


सातारा : सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाचा (सिव्हील) सहाय्यक अधीक्षक श्रीनिवास जोशी याला 30 हजार रुपयांची लाच प्रकरणी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. साताऱ्यातील ही धडक कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली असल्याचे समोर आले आहे.

याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांचे वैद्यकीय बिल सिव्हील हॉस्पिटलमध्ये मंजूर करुन घेण्याचे काम होते. यासाठी तक्रारदार हे सहाय्यक अधीक्षक वर्ग 2 चे असलेले अधिकारी श्रीनिवास जोशी यांना भेटले. संबंधित मेडीकल बिल मंजूर करुन देण्यासाठी जोशीने लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी सांगली एसीबी विभागात तक्रार दिली.

सांगली एसीबी विभागाने तक्रार दाखल करुन घेत 20 मे रोजी पडताळणी केली असता 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी होत असल्याचे समोर आले. लाचेची रक्कम बुधवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सायंकाळी ट्रॅप लावला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीने रंगेहाथ पकडून कारवाई केली. श्रीनिवास जोशी याची मूळ नियुक्ती काशीळ (ता. सातारा) येथे आहे. प्रतिनियुक्तीवर तो सिव्हीलमध्ये सहाय्यक अधीक्षक पदावर आहे. सांगली एसीबीचे पोनि योगेश चव्हाण, पोलिस धनंजय खाडे, अजित पाटील, सुदर्शन पाटील यांनी ही कारवाई केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉ. सुरेश भोसले, आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांची कराड बाजार समितीत भेट; कृष्णा साखर कारखाना निवडणुकीसाठीउंडाळकर-भोसले गट एकत्र येण्याच्या चर्चेला बळ
पुढील बातमी
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय नामदेव पाटील यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी नियुक्ती

संबंधित बातम्या