ठाण्यातील अग्निकांडात कोरेगावच्या बिचुकले गावातील अग्निशामक जवानाचा दुर्दैवी मृत्यू

by Team Satara Today | published on : 22 May 2026


सातारा : ठाणे येथील गावदेवी परिसरातील भाजी मार्केटमध्ये पहाटे लागलेल्या भीषण आगीत बचावकार्य करत असताना सातारा जिल्ह्यातील बिचुकले (ता. कोरेगाव) गावचे सुपुत्र आणि ठाणे महानगरपालिकेचे अग्निशामक जवान सागर सुरेश शिंदे (वय ४२) यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. भाजी मार्केटच्या गाळ्यात अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवत असताना त्यांनी वीरमरण पत्करले. या भीषण दुर्घटनेत एका सुरक्षा रक्षकाचाही मृत्यू झाला असून, जवान सागर शिंदे यांच्या निधनाचे वृत्त समजताच बिचुकले गावावर शोककळा पसरली आहे.

​गावदेवी भाजी मार्केटच्या गाळ्यांना पहाटे अचानक आग लागल्याची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सागर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र आगीने अल्पावधीतच अत्यंत रौद्र रूप धारण केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली होती. याच दरम्यान मार्केटच्या गाळ्यांमध्ये काही नागरिक अडकल्याचे लक्षात येताच, आपल्या प्राणाची पर्वा न करता सागर शिंदे व त्यांचे सहकारी थेट आगीच्या भक्ष्यस्थानी धावून गेले. त्यांनी अत्यंत कौशल्याने एका नागरिकाला आगीच्या विळख्यातून सुखरूप बाहेर काढले.

​त्यानंतर दुसऱ्या नागरिकाला वाचवण्यासाठी ते पुन्हा पुढे सरसावले, मात्र आगीच्या प्रचंड लोटात आणि धुराच्या साम्राज्यात जवान सागर शिंदे दुर्दैवाने अडकले. आग आणि उष्णतेची तीव्रता एवढी भीषण होती की त्यात होरपळून त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. अत्यंत शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावाचे म्हणून परिचित असलेले सागर शिंदे नेहमी गावातील सामाजिक कार्यातही अग्रेसर असायचे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, अवघ्या दोन महिन्यांची चिमुकली मुलगी आणि बहीण असा परिवार आहे. कर्तव्यावर असताना नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या शूर जवानाच्या अकाली निधनामुळे संपूर्ण कोरेगाव तालुक्यासह सातारा जिल्ह्यावर तीव्र शोककळा पसरली असून बिचुकले गाव शोकसागरात बुडाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
समाजसुधारणेचा दीपस्तंभ : राजा राममोहन रॉय

संबंधित बातम्या