सातारा : राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहनसंख्या लक्षात घेऊन खंडाळा, शिरवळ आणि इतर वाहतूक कोंडीच्या ठिकाणी स्वतंत्र पाच ते सहा फ्लायओव्हर्स उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे मुख्य रहदारीच्या गावालगत होणारी गर्दी कमी होऊन पुणे ते सातारा अंतर एका तासात पार करता येऊ शकते. औद्योगिक आणि मालवाहतूक ट्रकांमुळे निर्माण होणारी गर्दी कमी करण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठी पावले उचलली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच खंबाटकी घाट आणि पुण्यातील नवले पूल परिसराची पाहणी करून वाहतूक समस्यांचा आढावा घेतला. या मार्गावर पाच ते सहा ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासह इतर उपाययोजना केल्या जाणार असल्याने पुणे ते सातारा प्रवास अवघ्या एका तासात होणार आहे. यासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) केला जात आहे. या प्रकल्पामुळे सातारा- पुणे महामार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
महामार्गावरील वाढती वाहनसंख्या, राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक आणि सतत होणारी कोंडी यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जात आहे. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. पुणे- सातारा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नव्याने बहुपदरी फ्लायओव्हर्स उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये उड्डाणपूल उभारल्याने प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुणे- सातारा वेस्टर्न बायपास प्रकल्पासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपयांचा डीपीआरमुळे जड वाहतूक बाहेरून वळवण्यास मदत होणार आहे. सुमारे १४० किलोमीटरच्या नव्या मार्गाचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महामार्गावर पाच उड्डाणपूल
राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहनसंख्या लक्षात घेऊन खंडाळा, शिरवळ आणि इतर वाहतूक कोंडीच्या ठिकाणी स्वतंत्र पाच ते सहा फ्लायओव्हर्स उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे मुख्य रहदारीच्या गावालगत होणारी गर्दी कमी होऊन पुणे ते सातारा अंतर एका तासात पार करता येऊ शकते. औद्योगिक आणि मालवाहतूक ट्रकांमुळे निर्माण होणारी गर्दी कमी करण्यासाठी हे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
काम झाल्यानंतर सातारा ते पुणे अंतर एक तासात पूर्ण होऊ शकते
सातारा-पुणे महामार्गावरील ब्लॅक स्पॉट काढण्यात येणार आहेत, तसेच आवश्यक असणाऱ्या ठिकाणी उड्डाणपुलासह इतर उपाययोजना आखण्यात येणार आहेत. या प्रकल्पाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार डीपीआर करण्याचे काम प्रस्तावित असून, काम झाल्यानंतर सातारा ते पुणे अंतर एक तासात पूर्ण होऊ शकते.
- सुहास घंटे, वरिष्ठ अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण