सातारा : सातारा-लोणंद रस्त्यावरील शंभर वर्षांपूर्वीची वड, पिंपळ आणि आंब्याची झाडे बेकायदेशीरपणे तोडली जात असल्याचा आरोप करत मल्हार फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. वैभव मोरे यांनी जिल्हा उपवनसंरक्षक सातपुते यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.
रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान मंजूर मर्यादेपेक्षा अधिक क्षेत्रातील वृक्षतोड होत असल्याचे तसेच वाहतूक परवाना नसतानाही तोडलेली झाडे वाहतूक केली जात असल्याचे मोरे यांनी फोटोसह निदर्शनास आणून दिले. सुरुवातीला अशी कोणतीही बेकायदेशीर वृक्षतोड किंवा वाहतूक सुरू नसल्याचे उपवनसंरक्षकांनी सांगितल्याचा दावा मोरे यांनी केला. मात्र फोटो दाखवल्यानंतर अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती लक्षात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मोरे यांनी वन विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संबंधित ठेकेदाराने तोडलेली झाडे चोरीला गेल्याचा अर्ज विभागाकडे दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
निवेदनात म्हटले आहे की, शंभर वर्षांपूर्वीची प्राचीन वड, पिंपळ आणि आंब्याची झाडे ही पर्यावरणीय वारसा असून कार्बन शोषण, भूजल संरक्षण, तापमान नियंत्रण आणि सांस्कृतिक श्रद्धेचे केंद्र आहेत. अशा वृक्षांची मोठ्या प्रमाणावर होणारी तोड ही पर्यावरणासाठी अपरिवर्तनीय हानी ठरणारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.