'चाफ्याची फुले' ग्रामसंस्कृतीचा जिव्हाळा जपणारी - चंद्रकांत कांबीरे; कवी विश्वजित जाधव यांच्या 'चाफ्याची फुले' कवितासंग्रहाचे प्रकाशन

by Team Satara Today | published on : 20 May 2026


​सातारा: "चाफ्याच्या फुलांचा भावनिक सुगंध असणारी 'चाफ्याची फुले' या कवितासंग्रहातील कविता कवीचे भावविश्व उलगडून दाखवते. नात्यांचे अनेक पदर या कवितांतून उलगडले असून हा कवितासंग्रह निसर्ग, माती, नाती आणि ग्रामसंस्कृतीशी नाळ जोडणारा आहे. यातील अनेक कविता जिव्हाळा जपतात आणि अनेकांच्या जगण्याशी साम्यस्थळे जोडतात. गावाकडच्या नात्यांमधील आठवणींना उजाळा देतानाच,  आपण कितीही मोठे झालो, तरी आपली मुळे मातीत असल्याचे भान या कवितेला आहे. ही कविता आजी ,आजोबा, आई, शिक्षक ,पत्नी, मित्र अशा अनेक नात्यांचा आदर करते. कवी निर्मळ भावनेने आपला भवताल कवितेतून उभा करतो. विश्वजित जाधव यांची कविता अनुभूतीतून व्यक्त झाल्याने नुसती 'बरी' नाही, तर ती अधिक 'खरी' आहे," असे प्रतिपादन प्रसिद्ध रंगकर्मी व कवी चंद्रकांत कांबीरे यांनी केले.

​छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, मराठी विभागातील माजी विद्यार्थी कवी विश्वजित जाधव यांच्या 'चाफ्याची फुले' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा महाविद्यालयाच्या लोकनेते रामशेठ ठाकूर अभ्यासिकेत संपन्न झाला. छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा भाषा मंडळ व मराठी विभाग यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. डॉ. अशोक शेलार यांनी या काव्यसंग्रहातील कवितांची वैशिष्ट्ये आणि भाषिक सौंदर्य सांगून कवितांचे रसग्रहण व वाचन केले. कवी विश्वजित जाधव यांनी आपल्या मनोगतातून काव्यलेखनाची प्रेरणा उलगडली.

​छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभागप्रमुख तथा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात ते म्हणाले की, "मराठी विभागातील माजी विद्यार्थी कवी विश्वजित जाधव हे एक सदाचारी व संयमी व्यक्तिमत्व असून त्यांनी कॉलेजमध्ये असताना 'भावजागर' या भित्तीपत्रकाच्या संपादक मंडळात काम केले आहे. मराठी विभागात सतत येऊन ते विभागाच्या विविध उपक्रमांत योगदान देतात. महाविद्यालयातील कोणत्याही सर्जनशील लेखकास मराठी विभाग कायम सहकार्य करत राहील. छत्रपती शिवाजी कॉलेज हे आपले महाविद्यालय असून माजी व आजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पुन्हा वाङ्मयीन चळवळ करण्याची गरज आहे." प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली होती.

​कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका सविता कारंजकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक जीवन दणाणे यांनी मानले. या सोहळ्यासाठी प्रा. वैशाली जाधव, कवयित्री मनिषा शिरटावले, प्रा. संध्या लांडगे, डॉ. विद्या नावडकर, प्रा.राहुल गंगावणे प्रा. रमेश मस्के माजी मुख्याध्यापक शिवाजी भोसले, श्री. शिवाजी राऊत आदी मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेत मजुरीच्या पैशावरून आर्डे येथे एकाच्या खून; आठ जणांवर गुन्हा दाखल, गावात भितीचे वातावरण
पुढील बातमी
महाबळेश्वर तालुक्यात सौंदरी गावात मुसळधार वादळी पावसामुळे मोठे नुकसान; अनेक घरांची पडझड, काही घरांची छपरे उडाली

संबंधित बातम्या